
सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ, 31 मार्चपर्यंत कांदा निर्यातबंदी कायम!
- By -
- Feb 21,2024
देशांतर्गत बाजारांत कांद्याची उपलब्धता कायम राहावी आणि भाव नियंत्रणात राहावेत यासाठी 8 डिसेंबर 2023 रोजी अधिसूचना काढून 31 मार्च 2024 पर्यंत लागू केलेली निर्यातबंदी कायम असेल, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी मंगळवारी दिली. निर्यात बंदी उठवण्यात आलेली नाही. सद्या:स्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही. देशात कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करणे आणि त्याचे दर नियंत्रणात ठेवण्यास केंद्राचे प्राधान्य आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून कांद्याची निर्यात बंदी मागे घेण्यात आल्याचे वृत्त मागील आठवड्यात प्रसिद्ध झाले होते. यानंतर लासलगाव घाऊक बाजारात कांद्याचे दर कडाडले होते. प्रतिक्विंटलचे भाव 1280 रुपयांवरून 1800 रुपयांवर गेले होते. मात्र 31 मार्चपर्यंत निर्यात बंदी उठणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केल्याने कांद्याच्या दर वाढीवर नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.