
पणन संचालनालयाकडून बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी जाहीर !
- By -
- Oct 30,2023
राज्यातील बाजार समित्यांची सन 2022-23 ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीने संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावला आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पांतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची सन 2022 -23 या आर्थिक वर्षाच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांपैकी लासलगाव आणि बारामती बाजार समिती संयुक्तरीत्या पहिल्या क्रमांकावर असून वाशीम जिल्ह्यातील कारंजा (लाड) बाजार समिती दुसऱ्या तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती, पणन संचालक डॉ. केदारी जाधव यांनी दिली.
स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये मागील वर्षापासून अशा प्रकारे बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत आहे. बाजार समितीची क्रमवारी जाहीर झाल्यामुळे इतर बाजार समिती यांच्या तुलनेत शेतकरी शेतमाल नेत असलेल्या बाजार समितीचे स्थान शेतकऱ्यांना समजणार आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा बाजार समितीमध्ये निर्माण होण्यास चालना मिळणार आहे.
जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्प सुरु आहे. बाजार समित्यांची क्रमवारी निश्चित करण्यासाठी पणन संचालनालय कार्यालयाकडून जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेसाठी
बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना / उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार एकूण 35 निकष तयार करण्यात आलेले होते. या निकषाशी संबधित माहितीची संबधित तालुका व जिल्हास्तरीय समित्यांनी तपासणी करून एकूण 200 गुणांपैकी गुण देण्यात आलेले आहेत. या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्याची सन 2022-23 या वर्षाची क्रमवारी (रॅकिंग) निश्चित करण्यात आली आहे.